Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:59 IST2025-11-16T14:58:38+5:302025-11-16T14:59:58+5:30
BMC: मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पुढील दोन वर्षांसाठी उद्यान, मैदान, मनोरंजन आणि क्रीडांगणांच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या निविदेतील अटी आणि प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पुढील दोन वर्षांसाठी उद्यान, मैदान, मनोरंजन आणि क्रीडांगणांच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या निविदेतील अटी आणि प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. काही आक्षेप घेतले जात आहेत.ही निविदा पुन्हा एकदा ३० ते ३६ टक्के कमी दराने बोली लावून काम मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे कामाच्या अपेक्षित गुणवत्तेबाबत आणि प्रशासकीय नियमांविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या निविदेसाठी अर्ज केलेल्या २० पैकी १८ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. मात्र, काम मिळवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सलग सहा महिन्यांपासून अशा प्रकारचे काम करण्याचा अनुभव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.या अनुभवाच्या अटीमुळे, ज्या कंपन्या आधीपासून या कामात आहेत, त्याच कंपन्या सहज पात्र ठरत आहेत. परिणामी, निविदा प्रक्रियेत काही कंपन्यांच्या एकत्रित सहभागाची शंका व्यक्त होत आहे. महापालिकेतील वरिष्ठांची परवानगी न घेता या निविदेतील अटींमध्येबदल करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
नियमांचे पालन महत्त्वाचे
तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी निविदा रद्द करून अनामत रक्कम जप्त केली होती. त्यामुळे, आताही या प्रक्रियेत सहभागी झालेल्यांची अनामत रक्कम नियमानुसार जप्त करून निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी महापालिकेतील काही अधिकारी करत आहेत.
निविदा फेरविचाराधीन?
उद्यान विभागाच्या वतीने काढलेल्या निविदेतील प्रक्रियेत काही ठिकाणी कंत्राटदारांच्या बाजूने निर्णय घेतले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. निविदा फेरविचारासाठी रद्द होण्याची शक्यता आहे. परिणामी उद्यानांच्या देखभालीची अत्यावश्यक कामे थांबण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या नियमांविषयी मतभेद
महापालिकेच्या लेखा विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, निविदेत पात्र ठरल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनामत रक्कम भरणे अपेक्षित आहे, ज्यामुळे कोणी किती दराने बोली लावली हे गोपनीय राहते. उद्यान विभागाने या निविदेत वृक्ष छाटणीसाठी वापरले जाणारे परिपत्रक लागू केले आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया नियमांनुसार नसल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. एकाच विभागामध्ये (उद्यान) एकाच प्रकारच्या कामांसाठी (देखभाल) दोन वेगवेगळ्या प्रक्रिया का वापरल्या जात आहेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.