मुंबईसमोर रक्तटंचाईचे आव्हान; सुट्ट्या, पाणीटंचाई व दुष्काळामुळे रक्तदान शिबिरांची संख्या झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:27 AM2019-12-02T01:27:19+5:302019-12-02T01:27:31+5:30

अनेक पालिका, तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये वर्षातील बाराही महिने रक्ताचा तुटवडा असतो.

Bleeding challenge before Mumbai; Due to holidays, water shortages and drought, the number of blood donation camps has decreased | मुंबईसमोर रक्तटंचाईचे आव्हान; सुट्ट्या, पाणीटंचाई व दुष्काळामुळे रक्तदान शिबिरांची संख्या झाली कमी

मुंबईसमोर रक्तटंचाईचे आव्हान; सुट्ट्या, पाणीटंचाई व दुष्काळामुळे रक्तदान शिबिरांची संख्या झाली कमी

googlenewsNext

मुंबई : राज्यात आक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासतो. यंदाही राज्यासह मुंबईत रक्तटंचाईची तीव्र समस्या असून, सुट्टीचा कालावधी, महाविद्यालयांच्या सुट्ट्या, पाणीटंचाई व दुष्काळामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. अनेकांना रक्त किंवा रक्ताचे घटक वेळेवर उपलब्ध होत नसून, दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहर उपनगरातील सर्व रक्त पेढ्यांना तीव्र रक्तटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
अनेक पालिका, तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये वर्षातील बाराही महिने रक्ताचा तुटवडा असतो. रक्ताची उपलब्धता करून देण्यासाठी पर्यायी रक्ताची तजवीज करावी लागते. रुग्णांच्या नातेवाइकांना थेट विचारणा करून रक्त दिले जात नाही. खासगी रक्तपेढ्या, सरकारी रुग्णालयांना व सरकारी रुग्णालये ही इतर सार्वजनिक रुगणालयांशी संलग्न असलेल्या रक्तपेढ्यांना रक्त देण्यामध्ये उत्सुक नसतात. या सगळ्याचा परिणाम रक्तसंकलन आणि रक्ताची उपलब्धता करून देण्याच्या प्रक्रियेवर होत असल्याचे मत ब्लड फॉर सोसायटी संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुषा मानकर यांनी दिली.
दिवाळीनंतर सुरू होणारी आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत राहणारी रक्त युनिटची कमतरता ही आता नेहमीची वार्षिक बाब बनली आहे. या काळामध्ये दरवर्षी येणाऱ्या सुट्ट्यांचा हा परिणाम असून, ही समस्या सोडविण्यासाठी रक्त संकलनाचे योग्य नियोजन गरजेचे असल्याचे थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले. रक्तसंकलन अधिक झाल्यास टंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. त्यामुळे रक्तदान शिबीरे वाढविणे हा एकच पर्याय आहे.

३४१ रक्तपेढ्या सध्या राज्यात कार्यरत आहेत. यातील मुंबईत ५८, पुणे ३५, ठाण्यात २२, नागपूर व नाशिकमध्ये १५ आणि सांगली-सोलापूर १७ रक्तपेढ्या सुरू आहेत. गडचिरोली, गोंदिया, उस्मानाबाद, भंडारा आणि हिंगोली या ग्रामीण भागात प्रत्येकी एक किंवा दोन रक्तपेढ्या आहेत. वर्षाला राज्यात १० लाख युनिट्स रक्तपुरवठा गरजेचा असतो. मात्र, सरकारी रक्तपेढ्यांतून केवळ ३ लाख युनिट्स रक्तपुरवठा उपलब्ध केला जातो.


२०१८ मधील रक्त संकलन जिल्हानिहाय
मुंबई २,९८,५२३ युनिट्स,
पुणे २,२०,७८४ युनिट्स,
सोलापूर १,३०,८४६ युनिट्स, नागपूर १,२३,८६९ युनिट्स,
ठाणे १,१३,३९६ युनिट्स, अहमदनगर ७१,१४४ युनिट्स, नाशिक ८०,२५४ युनिट्स, औरंगाबाद ६५,४८५ युनिट्स, कोल्हापूर ६६,८६६ युनिट्स, सांगली ५१,९३५ युनिट्स.

या काळात महाविद्यालयांना सुट्ट्याअसल्याने रक्ताचा साठा संपला आहे. शहरात सध्या आठवडाभर पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. आमच्याकडे सर्व रक्तपेढ्यांचा मिळून ४,५०० युनिट इतका साठा उपलब्ध आहे, तर मुंबईची रोजची गरज सुमारे ८०० ते ९०० युनिट इतकी आहे. इतर महिन्यांमध्ये आमच्याकडे ७,००० ते १०,००० युनिटचा एकत्रित साठा उपलब्ध असतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर धार्मिक संस्था, प्रतिष्ठान अशा विविध घटकांशी बोलून रक्तसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ.अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

महाविद्यालयीन विद्यार्थी हे शहर उपनगरातील महत्त्वाचे रक्तदाते आहेत. मात्र, सध्या सुट्ट्यांचा कालावधी असल्याने रक्तटंचाई भासत आहे. मुंबईतील अनेक रक्तदाते सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील रक्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महिन्याला २५,००० रक्तदात्यांची गरज असते, पण सध्या तेवढे रक्तदाते उपलब्ध नाहीत, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे
- राजेंद्र कुलकर्णी, रक्तदाता

Web Title: Bleeding challenge before Mumbai; Due to holidays, water shortages and drought, the number of blood donation camps has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.