रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार; २८४ इंजेक्शन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:05 AM2021-04-10T04:05:47+5:302021-04-10T04:05:47+5:30

गुन्हे शाखेकडून दाेघांना अटक; फार्मा कंपनीचा मालक करत होता विक्री लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ...

Black market of remedicivir drugs; 284 injections confiscated | रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार; २८४ इंजेक्शन जप्त

रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार; २८४ इंजेक्शन जप्त

Next

गुन्हे शाखेकडून दाेघांना अटक; फार्मा कंपनीचा मालक करत होता विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात गुन्हे शाखेने गुरुवारी केलेल्या कारवाईत रेमडेसिवीर १०० ग्रॅमची २८४ इंजेक्शन जप्त करण्यात आली. फार्मा कंपनीचा मालकच चढ्या दराने त्यांची विक्री करत होता. याप्रकरणी दाेघांना अटक करण्यात आली आहे.

जोगेश्वरीत रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष १०ने एफडीएच्या पथकासह गुरुवारी सापळा रचून सरफराज जावेद हुसेन (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत रेमिडेसिवीर १०० ग्रॅमची १२ इंजेक्शन सापडली. त्याच्याकडे याबाबतचे बिल नव्हते. हुसेनने ती इंजेक्शन जोगेश्वरी पश्चिमेकडील गांधीनगर येथील जी. आर. फार्मा कंपनीच्या मालकाकडून ८ हजार रुपये दराने घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने कंपनीच्या गोडावूनची झडती घेतली असता, तेथे रेमिडेसिवीर १०० ग्रॅमची २७२ इंजेक्शन सापडली. या कारवाईतून एकूण १३ लाख ६३ हजारांचा साठा जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेने फार्मा कंपनीला टाळे ठोकले आहे. हुसेनसह फार्मा कंपनीचा मालक जावेद अख्तर अब्दुल रेहमान शेख (४६) यालाही अटक करण्यात आली आहे. हुसेन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण २८४ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली. याप्रकरणी अंधेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी दाेघांनाही अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, असा काळाबाजार करणाऱ्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना जास्तीचे पैसे देऊन इंजेक्शन खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे.

......................

Web Title: Black market of remedicivir drugs; 284 injections confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.