लीलावती रुग्णालयात काळी जादू? मडक्यात सापडली हाडे, केस अन् तांदूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 06:31 IST2025-03-13T06:30:49+5:302025-03-13T06:31:24+5:30

ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती.

Black magic at Lilavati Hospital Bones found in pot | लीलावती रुग्णालयात काळी जादू? मडक्यात सापडली हाडे, केस अन् तांदूळ

लीलावती रुग्णालयात काळी जादू? मडक्यात सापडली हाडे, केस अन् तांदूळ

मुंबई : लीलावती रुग्णालयातील १२५० कोटींच्या घोटाळ्याने प्रकरण तापले असताना, रुग्णालयात काळी जादू केल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. त्याआधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता तेथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस आणि कर्मकांडांसाठी आवश्यक सामग्री सापडल्याचा दावा कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी केला. 

सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळी जादूबाबतची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिल्याने न्यायालयाकडे तक्रार नोंदविण्यात आली. दंडाधिकारी स्वतः चौकशी करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र हे कोणी आणि का ठेवले, याचा तपास सुरू आहे. 

आरोपींची दुबईत पार्टी?

आरोपींची दुबईत सिने कलाकारांसोबत पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असताना, आरोपी मात्र पार्टी करत असल्याचा आरोप व्हिडीओद्वारे करण्यात येत आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

१२५० कोटींच्या आरोपावरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

... तर तीन रुग्णालये उभी राहिली असती

आरोपी माजी विश्वस्तांनी अपहार केलेल्या रकमेद्वारे आर्थिक गैरव्यवहार केले आणि परदेशात बेहिशोबी मालमत्ता विकत घेतल्याचा संशय असून, त्याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडेही (ईडी) पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. माजी विश्वस्तांविरोधात नोंद झालेला हा तिसरा गुन्हा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लीलावती रुग्णालय ही धर्मदाय संस्था असून, आरोपींनी उकळलेल्या रकमेतून समाज कल्याणासाठी आणि गरजूंसाठी अशी तीन रुग्णालये उभारता आली असती, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 

Web Title: Black magic at Lilavati Hospital Bones found in pot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.