डम्पिंगच्या धुराने काळवंडली युती

By Admin | Published: March 31, 2016 02:15 AM2016-03-31T02:15:14+5:302016-03-31T02:15:14+5:30

शिवसेना भाजपा युतीमध्ये आता देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीवरून कलगीतुरा रंगला आहे़ देवनार डम्पिंग ग्राउंडप्रकरणी आंदोलनाचा इशारा खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्याने,

Black and white coal dumping | डम्पिंगच्या धुराने काळवंडली युती

डम्पिंगच्या धुराने काळवंडली युती

googlenewsNext

मुंबई : शिवसेना भाजपा युतीमध्ये आता देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीवरून कलगीतुरा रंगला आहे़ देवनार डम्पिंग ग्राउंडप्रकरणी आंदोलनाचा इशारा खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्याने, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची आज दिल्लीत हजेरी घेतली़ कचऱ्याची विल्हेवाट हे पालिकेचे काम असून, ते काम पालिकेने करावे, असा खडे बोलही त्यांनी शिवसेनेला सुनावले आहेत़
दोनच दिवसांपूर्वी आयुक्त, महापौर आणि सेनेच्या खासदार आमदारांसह राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट दिली होती. भेटीनंतर त्यांनी या आगीमागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता. या आगीच्या घटनांचे पडसाद दिवसेंदिवस विविध माध्यमांतून उमटत असल्याचे आता दिसत आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडवर वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने, याचे तीव्र पडसाद केंद्रातही उमटू लागले आहेत़ विरोधकच नव्हे, तर भाजपानेही या प्रकरणी शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे़ त्यामुळे उभय पक्षांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत़ त्यात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता व अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी, नगरविकास खाते व पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांना आज दिल्लीत बोलावले होते़
कचऱ्याच्या समस्येकडे आतापर्यंत लक्ष दिले नाही, अशी नाराजी या बैठकीत त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते़ मुलुंडचा कचराडेपो बंद होईल, त्यासाठी निविदा १५ दिवसांमध्ये काढण्यात येतील़ कचरा प्रक्रियेसाठी टाटा कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे़ कांजुर मार्गमध्ये डम्पिंगसाठी जागा आहे़ तिथे बायोमिथेनेशन प्रक्रिया यशस्वी
ठरली़ त्याचा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली़ (प्रतिनिधी)

भाजपाचा पलटवार
तीन महिन्यांमध्ये डम्पिंग ग्राउंडचा विषय निकाली काढला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे़
तर कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे महापालिकेचे काम आहे़ हे काम तिनेच करावे, आम्ही सहकार्य करू, असे खडे बोल केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुनावले आहेत़
१ कोटी २० लाख टन कचरा मुंबईतील डम्पिंग ग्राउंडवर साठला आहे़
कांजुर मार्ग डम्पिंग ग्राउंडच्या विस्तारासाठी सागरी नियंत्रण क्षेत्राची परवानगी देण्यात येईल़

Web Title: Black and white coal dumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.