Join us

रावसाहेब दानवेंचा राजीनामा; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:17 IST

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई/नवी दिल्ली -  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या राज्यातील नेतृत्वात बदल होणार आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे यांची निवड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली होती. दानवेंच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपाने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला चांगले यश मिळाले. मात्र गेल्या पाच वर्षांत रावसाहेब दानवे हे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार अडचणीत आले. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंवर चौफेर टीका झाली होती. तसेच नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दानवे यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचा उल्लेख अतिरेकी असा केला होता. 

टॅग्स :रावसाहेब दानवेभाजपामहाराष्ट्र