भाजयुमोचा ‘छत्रपती सन्मान मोर्चा’, दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 15, 2026 18:05 IST2026-02-15T18:05:20+5:302026-02-15T18:05:40+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप

भाजयुमोचा ‘छत्रपती सन्मान मोर्चा’, दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी
मुंबई - भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे आज दादर (पूर्व) येथील स्वामी नारायण मंदिर समोर ‘छत्रपती सन्मान मोर्चा’ काढण्यात आला.मोर्चा शांततेत पार पडला असून, पोलिस बंदोबस्तात कार्यक्रम निर्विघ्नरित्या संपन्न झाला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संबंधित वक्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजयुमो कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला व संबंधितांकडून तात्काळ जाहीर माफीची मागणी केली.
मोर्चाचे नेतृत्व भाजयुमो मुंबई अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ४७चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केले. यावेळी जिल्हा, मंडळ व विभाग पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. ‘छत्रपतींचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी तिवाना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव देशभर केला जातो. अशा महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबाबत केलेले कोणतेही आक्षेपार्ह विधान महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे आहे. संबंधितांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजयुमोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाच्या प्रश्नावर संघटना कोणतीही तडजोड करणार नाही. भविष्यात अशा प्रकारची विधाने झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.