मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:25 IST2025-12-29T10:25:08+5:302025-12-29T10:25:31+5:30
..या प्रलंबित जागांवर एकमत न झाल्यास ‘उमेदवार भाजपचा, मात्र निवडणूक चिन्ह शिंदेसेनेचे’ असा अदलाबदलीचा फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत असा प्रयोग यापूर्वीही करण्यात आला होता.

मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
मुंबई : मुंबईत भाजप-शिंदेसेना महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून एकूण २२७ जागांपैकी २०७ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उर्वरित सुमारे २० जागांवर अद्याप तोडगा निघालला नाही. या प्रलंबित जागांवर एकमत न झाल्यास ‘उमेदवार भाजपचा, मात्र निवडणूक चिन्ह शिंदेसेनेचे’ असा अदलाबदलीचा फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत असा प्रयोग यापूर्वीही करण्यात आला होता.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना शिंदेसेनेत प्रवेश देऊन त्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडून आले. त्याचप्रमाणे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या शायना एन. सी. यांना शिंदेसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती. हाच फॉर्म्युला महापालिका निवडणुकीतही अखेरच्या क्षणी लागू होण्याची शक्यता एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली.
महायुतीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने अशा अदलाबदलीत भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याचे समाधान पक्षाला मिळते; तर, शिंदेसेनेला पक्षाच्या वाट्याला एक जागा वाढल्याचा लाभ होतो, असे त्या नेत्याने स्पष्ट केले. त्यामुळे चार ते पाच जागांवर असा तोडगा निघू शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. हा प्रयोग भाजप-शिंदेसेना किंवा त्यांच्या रिपब्लिकन गटासोबतही होऊ शकतो, असे त्याने सांगितले. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असून, आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष शिंदेसेनेसोबत आहे.
आता उच्च पातळीवर होणार चर्चा
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी भाजपला १२८, तर शिंदेसेनेला ७९ जागांवर सहमती झाल्याची माहिती दिली. उर्वरित जागांवर उच्च पातळीवर चर्चा होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असतानाही सर्वच प्रमुख पक्षांनी अंतिम उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. रविवारी रात्री उशिरा शिंदेसेना तसेच उद्धवसेनेकडून काही निवडलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.