भाजपचा कार्यकर्त्यांना ४० कलमी कार्यक्रम; मिशन महापालिकेची सुरुवात, लहान-लहान समाजांच्या बैठका
By यदू जोशी | Updated: December 18, 2025 11:20 IST2025-12-18T11:19:29+5:302025-12-18T11:20:25+5:30
तीन दिवस 'घर चलो अभियान', १२२ सरकारी योजनांची माहिती पोहोचवणार

भाजपचा कार्यकर्त्यांना ४० कलमी कार्यक्रम; मिशन महापालिकेची सुरुवात, लहान-लहान समाजांच्या बैठका
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपने महापालिका निवडणुकीसाठी आपले कार्यकर्ते, नेते यांना ४० कलमी कार्यक्रम दिला आहे. त्याची अंमलबजावणी 'मिशन महापालिका'द्वारे गुरुवारपासून राज्यभरात केली जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या १२२ लोकाभिमुख योजनांचे एक पॅम्प्लेट तयार करून घरोघरी त्याचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी 'घर चलो अभियान' राबविले जाणार आहे. तीन दिवसांचे हे अभियान असेल आणि ते २३ डिसेंबरच्या आत महापालिकेच्या प्रत्येक शहरात ते पूर्ण केले जाणार आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेसह सर्व लोकाभिमुख योजनांच्या, प्रत्येक महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पक्षातर्फे आधीच सुरू करण्यात आले आहे. अशा लाभार्थ्यांच्या गाठीभेटी घेणे हा प्रचाराचा एक भाग असेल.
वकील, डॉक्टर, सीए, इंजिनिअर आणि समाजातील अन्य मान्यवर व्यक्ती ज्या भाजपमध्ये नाहीत; पण समाजावर प्रभाव टाकतात, त्यांच्या गाठीभेटी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्याव्यात, त्यांच्याशी चर्चा करून पक्षाविषयीच्या त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
समाज बैठकांवर भर
मोठ्या समाजांशी संपर्क ठेवतानाच लहान-लहान समाजातील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घ्या, त्यांना पक्षाचा अजेंडा समजावून सांगा.
या समाजांचे आपल्या पक्षात जे विभागीय वा राज्यस्तरीय नेते आहेत, त्यांच्याशी समाजबांधवांचा संवाद घडवून आणा. लहान-लहान समाजांनी विधानसभेत भाजप-महायुतीला मोठे सहकार्य केले होते, ते पुढे नेण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
भाजपचे राज्यस्तरीय नेते सध्या विविध विभागीय बैठका घेत असून त्यांत या सूचना देण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी भाजपच्या प्रचार नियोजनाबाबतची माहिती 'लोकमत'ला दिली.
संघ परिवार आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार
रा. स्व. संघ, संघ परिवार आणि विचार परिवारातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणेचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत या समन्वयाचा मोठा फायदा झाला होता.
नगर परिषद निवडणुकीत मात्र या बाबतीत त्यांना अपेक्षेनुसार विश्वासात घेण्यात आले नव्हते, अशा तक्रारी काही ठिकाणी पुढे आल्या होत्या, आता त्यात दुरुस्ती केली जाणार आहे.
शिंदेसेनेशी युती करायची, अजित पवारांबाबत चुप्पी
शिंदेसेनेशी आपल्याला युती करायचीच आहे, त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करा. शिंदेसेनेकडून मागणी होत असलेल्या जागांपैकी त्यांना कोणत्या जागा देण्याबाबत अडचणी आहेत आणि या अडचणी का आहेत, हे विभागीय संघटन मंत्र्यांना तातडीने कळवा आणि मार्ग काढा, असे बजावण्यात आले आहे.
त्यानुसार निम्याहून अधिक महापालिकांमध्ये युतीसाठी चर्चेची पहिली फेरी पूर्णही झाली आहे. मात्र, अजित पवार गटाशी युती करण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. अजित पवार गटासोबत युती करण्याबाबत भाजपमधील एक गट विरोधात आहे.