- महेश पवारमुंबई : मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी तीन मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. १०० बुथमागे एक मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी १०८ मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. मुंबई प्रदेश कोअर कमिटीची शुक्रवारी बैठक होणार आहे. यात छाननी करण्यात आलेल्या मंडल अध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष (विधानसभा अध्यक्ष), जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी रचना आहे. विधानसभेतील यशानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. त्यामुळे एका विधानसभेसाठी तीन मंडल अध्यक्षपद पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसाठी ३५ ते ४५ या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे.
तरुण, महिलांना राजकारणात संधी
भाजपने परिवारवादाला स्थान न देता सामान्य कार्यकर्त्याला योग्य संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नवतरुण, महिलांना राजकारणात संधी मिळेल. योग्य व्यक्तीच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. मुंबई कमिटी आणि कोअर कमिटीकडून मंडळ अध्यक्षांची नावे निश्चित करण्यात येतील. तर महिनाअखेरपर्यंत जिल्हाध्यक्ष पदांसाठी प्रक्रिया सुरू होईल. -राजेश शिरवाडकर (भाजप जिल्हाध्यक्ष, दक्षिण-मध्य मुंबई)
पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा केला विचार
भाजपने मंडल अध्यक्ष निवडीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवले होते. त्यांनी एका जागेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन नावांची शिफारस घेतली. १६ एप्रिलपर्यंत ही नावे बंद पाकिटात भरून कोअर कमिटीकडे पाठविण्यात आली.
कोअर कमिटीने नावांची छाननी केली असून, त्या व्यक्तीची मंडल अध्यक्ष म्हणून निवड का करावी? सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी, पक्षासाठी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून १०८ मंडल अध्यक्षांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.