Join us

भाजप फेरीवाल्यांच्या पाठीशी: आशिष शेलार, दादरमध्ये झाला विशेष कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:45 IST

दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांचे जगण्याचे, रोजीरोटीचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका घेत अधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या कायमच्या सोडवू असे आश्वासन मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मुंबई भाजप हॉकर्स युनिटच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ॲड. शेलार म्हणाले की, फेरीवाल्यांच्या परिश्रमाची समस्यांची जाणीव आहे. ऊन, पाऊस, थंडी याचा विचार न करता फेरीवाले बांधव व्यवसाय करतात. मुंबईतील गुन्हेगारी थांबली पाहिजे यासाठी कायदा व्यवस्थेला फेरीवाले मदत करतात. फेरीवाले ‘खरे मुंबईकर’ आहेत. आम्ही बेकायदा फेरीवाल्यांची बाजू कधीच घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या धोरणानुसार फेरीवाल्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळाले पाहिजेत असेही ते म्हणाले. याआधीच फेरीवाला धोरण अंमलबजावणी अपेक्षित होती. या बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी काळात व्हेडिंग कमिटीच्या निवडणुका झाल्या नाहीत.

... तर हे झाले नसते

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या असत्या तर आज ही स्थिती उद्भवली नसती. फेरीवाल्यांसाठी कायदेशीर लढाईसाठी वकील म्हणून मी स्वतः उभा राहणार असल्याची ग्वाही शेलार यांनी या वेळी दिली. या वेळी आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजप हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी, अमरजीत मिश्रा यांच्यासह फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :आशीष शेलारभाजपा