मुदत संपण्याच्या अर्धा तास आधी भाजप देणार बी फॉर्म, बंडखोरी टाळण्यासाठी उपाय, यादी नाहीच; तगड्या उमेदवारांपुढे संकट
By यदू जोशी | Updated: December 29, 2025 15:51 IST2025-12-29T15:50:06+5:302025-12-29T15:51:25+5:30
निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की एखाद्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरताना पक्षाचा बी फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत बी फॉर्म हा द्यावाच लागतो.

मुदत संपण्याच्या अर्धा तास आधी भाजप देणार बी फॉर्म, बंडखोरी टाळण्यासाठी उपाय, यादी नाहीच; तगड्या उमेदवारांपुढे संकट
यदु जोशी -
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अर्धा ते एक तास आधीच पक्षातर्फे अधिकृत उमेदवारास बी फॉर्म देण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन हा नवीन उपाय शोधून काढण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की एखाद्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरताना पक्षाचा बी फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत बी फॉर्म हा द्यावाच लागतो. जो उमेदवार पक्षाचा बी फॉर्म घेतो, तोच अधिकृत उमेदवार मानला जातो आणि त्यालाच पक्षाचे चिन्ह
दिले जाते.
नगरपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा असलेले हजारो जण आहेत. बहुतेक पालिकांत एकेका जागेसाठी भाजपकडे ७५ ते १०० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे बंडखोरीची सर्वाधिक भीती ही भाजपला आहे.
मुंबईतील यादी येणार?
मुंबई महापालिकेत बंडखोरीची शक्यता नाही असा विश्वास स्थानिक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे आणि सोमवारी यादी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, बी. एल.संतोष, मंत्री आशिष शेलार मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली.
त्यात उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली ही नावे उद्या जाहीर करावीत असा आग्रह मुंबई भाजपने धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कल : अगदी वेळेवर बी फॉर्म देण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे, त्यांच्यापैकी जे तगडे उमेदवार आहेत ते लगेच इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवू शकतात. तशी संधी त्यांना मिळू नये म्हणूनही वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. भाजपने रविवारी रात्रीपर्यंत एकाही महापालिकेसाठी अशी यादी जाहीर केलेली नव्हती. बंडखोरी टाळण्यासाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे.
आमदार, खासदार, मंत्र्यांच्या नातेवाईकांना तिकीट नाही
भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री यांच्या नातेवाईकांना महापालिकेचे तिकीट दिले जाणार नाही. माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही माहिती दिली. आमदार, मंत्री, खासदारांचे जे नातेवाईक पहिल्यापासूनच महापालिकेच्या राजकारणात आहेत आणि जे पूर्वी नगरसेवक होते, अशांना संधी देण्याचा विचार केला जाईल.
कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, पण त्यांनी माघार घेतली. नेत्यांच्या नातेवाइकांना तिकीट न देण्याच्या नियमाचा फटका त्यांना बसला, असे म्हटले जात आहे.