Join us

भाजप देणार आणखी एक राजकीय धक्का? शरद पवारांच्या निकटच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली

By यदू जोशी | Updated: February 19, 2024 06:47 IST

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यदु जोशी

मुंबई : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) काही जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजपश्रेष्ठींनी आखली आहे. लोकसभेच्या राज्यातील ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल, अशी या रणनीतीमागील भूमिका आहे.

भाजपचे लक्ष्य आता पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागात चांगला शिरकाव केला असला तरी अजून पूर्ण पकड भाजपला या भागात घेता आलेली नाही. म्हणूनच शरद पवार यांच्यासोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार, मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत इन्कार केला.

‘तो’ नेता कोण?

शरद पवारांसोबत असलेल्या या नेत्याला पक्षात आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये शक्ती वाढेल, असे भाजपचे समीकरण आहे. दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या या नेत्याचे सहकार क्षेत्रातही मोठे नाव आहे.

या नेत्याच्या भाजपच्या राज्यातील एका बड्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोकसभेला उभे करायचे या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना या नेत्याचे अजित पवारांशी फारसे सख्य नव्हते, पण शरद पवार यांचे खास म्हणून त्यांचे महत्त्व पक्षात कायम राहिले.

अशोक चव्हाणांमुळे मराठवाड्यात मिळाले बळ

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा नांदेड, परभणी, हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत होईल. लोकसभेच्या जागावाटपात नेहमीच शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या. शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वत:ची ताकद मराठवाड्यात वाढविली पाहिजे या भूमिकेतूनच चव्हाण यांना सोबत घेतले गेले.

टॅग्स :भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार