Join us  

नव्या बहुजन नेतृत्वाला भाजप प्रोत्साहन देणार; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 3:45 AM

एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंच्या भूमिकेनंतर नवी रणनीती

- यदु जोशीमुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी बंडाची भाषा सुरू केल्यानंतर त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्याऐवजी हळुहळू नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन देऊन बहुजन समाजातील नवे नेतृत्व राज्य पातळीवर तयार करायचे अशी रणनीती भाजपने आखली असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्य पातळीवरील बहुजन नेतृत्व म्हणून पक्षाने ज्यांना समोर आणू शकतो त्यात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री व आमदार डॉ. संजय कुटे, आ. किसन कथोरे, आ. मनीषा चौधरी, आ. अतुल सावे, माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, खा. रामदास तडस, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड, आ. तुषार राठोड, आ. नीलय नाईक यांचा समावेश आहे. ते कुणबी, माळी, तेली, बंजारा समाजाचे आहेत. या शिवाय, वंजारी, लेवा पाटील आदी समाज घटकांना पुढे आणले जाईल.

भाजपने गेल्या काही वर्षात राज्य पातळीवर बहुजन नेतृत्व मोठे करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. जे तरुण बहुजन नेते गेल्या काही वर्षांत समोर आले ते आपापल्या जिल्ह्यांपुरतेच मोठे झाले. आता त्यांना पक्षसंघटनेत वा अन्य माध्यमातून समोर आणण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असे मानले जाते. या नेत्यांना आज खडसे, मुंडे यांच्यासारखे राजकीय वलय नसले तरी त्यांना पक्षात महत्त्व देऊन राज्य पातळीवर पुढे आणता येईल, असा विचार प्रामुख्याने केला जात आहे.

सूत्रांनी सांगितले की मी पक्षातच राहणार, पक्षाने माझ्याबाबत काय तो निर्णय घ्यावा, असे आव्हान पंकजा मुंडे यांनी दिले असले आणि मला गृहित धरु नका असा इशारा खडसे यांनी दिला असला तरी त्यांच्याविरुद्ध भाजपकडून तडकाफडकी कारवाई केली जाणार नाही. भाजप आज राज्यात विरोधी पक्षात असला तरी त्यांच्याकडे ११४ आमदार आहेत. तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही आणि वेगळी समीकरणे तयार होऊन भाजपला पुन्हा सत्तेची संधी मिळू शकते. त्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवायचे असतील मुंडे, खडसे यांना सांभाळून घ्यायचे पण त्याचवेळी पुढील १०-१५ वर्षांचा विचार करून नव्या चेहºयांना पुढे आणण्याची रणनीती आखली जाणार आहे.

टॅग्स :भाजपाचंद्रकांत पाटीलएकनाथ खडसेपंकजा मुंडेमहाराष्ट्र सरकार