Join us

मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:42 IST

मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, पण  भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत्या कामाला सुरुवात केली होती, त्याचा परिणाम विधानसभेत दिसला. त्यामुळे आता महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी २५ ते ३० वयोगटांतील किमान १५ टक्के तरुणांना नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले .

मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, पण  भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. जे मतदार निवडणुकीसाठी घरातून बाहेर पडले नव्हते, त्यांची बूथनिहाय माहिती घेऊन आम्ही लोकसभेनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मतदान केंद्रापर्यंत यावे,  यासाठी जागृती केली. त्याचा फायदा आम्हाला विधानसभेत झालेला दिसला. त्याच पद्धतीची रणनीती आता महापालिकेसाठीही आखली जात आहे, असेही शेलार म्हणाले. 

महायुती १८५ जागा जिंकणारच गेल्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेसाेबत ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी आम्ही धाकटे भाऊ हाेताे. आता मुंबई भाजपच मोठा भाऊ आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मदतीने मुंबईवर आम्ही महायुतीचा झेंडा फडकवणारच आहोत. महायुतीच्या १८५ जागा आल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावाही शेलार यांनी केला.

भावनिक मुद्दे किती काळ? मुंबई तोडणार, अदानी, अंबानी, धारावी या पलिकडे विरोधक दुसरे काहीच बोलत नाहीत.  महायुतीने इतक्या वेगात विकास सुरू केला आहे की विरोधकांकडे मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे त्यांनी निवडणूक कितीही भावनिक करण्याचा प्रयत्न केला तरी मतदान हे विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे. मुंबईत विविध प्रकल्प मतदार दृष्टीआड करणार नाहीत. त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहे. 

 महापालिका निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये सहभागी व्हावे, असे वाटत असेल तर निश्चितच त्यांचे स्वागत आहे. त्याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :आशीष शेलारभाजपामुंबई महानगरपालिका