Join us

महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:58 IST

BJP Sudhir Mungantiwar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.

BJP Sudhir Mungantiwar News: राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे बीड, परभणी, मराठा आरक्षण, ईव्हीएमवर विरोधकांनी उपस्थित केलेली शंका यावरून राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते. यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

महापालिका निवडणुकीत मनसेशी युती होणार का? 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. यानंतर आता भाजपा आणि मनसेची युती होणार का, यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, सांगता येणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्याकडे भेटायला गेले. मला व्यक्तिगतरित्या एक गोष्ट माहिती आहे की, कोणत्याही राजकीय चर्चा करायच्या असतील तर इतक्या उघडपणे कोणी जाणार नाही. त्यासाठी राजकारणात गुप्त बैठका, भेटी होतात. त्यामधूनच हे सर्व प्रकरण पुढे जात असते. इतक्या उघडपणे जाऊन युतीच्या चर्चा, पाठिंब्याच्या चर्चा कधीच होत नाहीत. प्रदेशाचा अध्यक्ष राहिलो आहे, नाशिकमध्ये आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा मला जाणीव आहे की, आमच्या भेटी कधीच उघड झाल्या नाहीत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलेपणाने गेले याचा अर्थ...

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भेट झाली म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण कधीकधी काही कामे असू शकतात. मैत्रीचे धागे असू शकतात. त्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीचा उद्देश हा काही राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करण्यासाठी गेले असे म्हणणे योग्य होणार नाही. इतक्या खुलेपणे देवेंद्र फडणवीस गेले याचा अर्थ इथे कोणताही राजकीय हेतू नाही हे समजून घ्यायचे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ईव्हीएमबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. आपण काही सर्वांच्या शंकांना उत्तर द्यायला जात नाहीत. राहुल गांधींनी याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांचे उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे समाधान कदापि होणार नाही. एकदा त्यांच्या मनात आपली काही चूक नाही, ही सर्व ई्व्हीएम मशीनची चुक आहे हा भाव गेला की तो या जन्मात तरी सहजासहजी निघणे सोपे नाही, अशी टोलेबाजी मुनगंटीवार यांनी केली.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेभाजपामनसे