नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:32 IST2025-12-21T16:28:53+5:302025-12-21T16:32:46+5:30
BJP Ravindra Chavan News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी ५० हून अधिक सभा घेतल्या, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
BJP Ravindra Chavan News: जनतेने मतांचा कौल हा महायुतीला दिला आहे. विधानसभेत महायुतीला असेच स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला कौल मिळाला. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. अद्यापही सर्व निकाल घोषित व्हायला काही अवधी आहे. मात्र, निकालाचा जो कल आहे तो कल महायुतीला आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. या सगळ्याचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसत आहे, तर काही ठिकाणी गड राखण्यात यश येत आहे. निवडणुकीचे निकाल हाती येत असताना सर्वच पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही या निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले.
महायुतीला दिलेला हा कौल पाहता जनतेचे आभार मानावे तेवढे कमी
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीला दिलेला हा कौल पाहता जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कोरोनानंतर निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या निवडणुका आहेत. २८८ पैकी २३६ ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष व त्याचबरोबर विविध ठिकाणी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्यापैकी १२२ ते १३४ ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. जवळपास तीन हजारांच्या आसपास संख्येत नगरसेवक जिंकून येताना दिसत आहेत, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत रात्रीचा दिवस केला. ५० हून अधिक सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीसांनीच सभा घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यावेळी ऑनलाइन सभा घेतल्या. कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत वेळ दिला आणि सहभागही घेतला. महायुतीच्या नेत्यांनी पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय या सगळ्या गोष्टींचा फायदा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात झाला, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.