Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचे वंशज भाजपात आल्याचा विरोधकांना धसका; शिवस्मारकावरील आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:51 IST

एकही वीट न रचता पैसे दिल्या गेल्याचाही आरोप धादांत खोटा आहे. मुळात 2 ते 3 महिने शिवस्मारकाचे प्राथमिक काम झाले आहे आणि एकही रूपया अजून कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही.

मुंबई - पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर केली आहे.

गेल्या पाच वर्षात राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

याबाबत पाटील म्हणाले की, मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, यापलिकडे कोणताही धंदा सचिन सावंत यांनी केला नाही आणि नवाब मलिक यांना तर शिवस्मारकाचे कधीच अप्रुप नव्हते, त्यामुळेच पोकळ आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मार्च 2018 मध्ये या विषयावर सविस्तर निवेदन राज्याच्या विधानसभेत केले होते. प्रत्यक्ष पुतळा आणि चौथरा याचे गुणोत्तर 60:40 असे असते. त्यानुसार, 210 मीटर उंचीच्या पुतळ्यामध्ये 121.2 मीटर व 88.8 मीटर असे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून प्रस्तावित केली. प्रारंभी निविदा प्रक्रिया जरी 210 मीटरच्या हिशेबाने पूर्ण करण्यात आली तरी त्यानंतर उंची 212 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात चबुतर्‍याची उंची कायम ठेऊन पुतळ्याची उंची वाढविण्यात आली. केंद्राकडून सर्व परवानग्या आणण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू करण्यापर्यंत सर्व कामे ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात झाली आणि आपण ती करू शकलो नाही, याचेच शल्य विरोधकांच्या मनात आज अधिक आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 

तसेच एकही वीट न रचता पैसे दिल्या गेल्याचाही आरोप धादांत खोटा आहे. मुळात 2 ते 3 महिने शिवस्मारकाचे प्राथमिक काम झाले आहे आणि एकही रूपया अजून कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही. कंत्राट अंतिम करताना मुख्य सचिवांची समिती असते, तर सर्व निर्णय हे सुकाणू समितीत सर्व संमतीने होत असतात. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांचा सुद्धा समावेश असतो. मुळात शिवाजी महाराजांचा सन्मानच आघाडी सरकारला करता आला नाही आणि आता काम होताना दिसते आहे, तर त्यांना पोटशूळ उठला आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलछत्रपती शिवाजी महाराजशिवस्मारकराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस