भाजपकडून व्हेज - नॉनव्हेजवर प्रचार सुरू; आदित्य ठाकरेंचा मुंबईत गंभीर आरोप
By रेश्मा शिवडेकर | Updated: April 14, 2024 22:37 IST2024-04-14T22:35:57+5:302024-04-14T22:37:24+5:30
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी गोरेगावमध्ये घेण्यात युवा राष्ट्राभिमान मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपकडून व्हेज - नॉनव्हेजवर प्रचार सुरू; आदित्य ठाकरेंचा मुंबईत गंभीर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात सध्या वातावरण असे आहे की आझादी बोलले की केस टाकली जाते. देशात कुणी काय खायचे कुणी काय घालायचे हेही ठरवण्याचा अधिकार नाही. भाजपचा प्रचारच व्हेज- नॉनव्हेजवर सुरू आहे. भाजपच्या अशा एकाधिकारशाहीला तुम्ही चालू देणार का, असा सवाल उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी गोरेगावमध्ये घेण्यात युवा राष्ट्राभिमान मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सेना नेते आमदार सुभाष देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह शिक्षक आमदार कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते.
आज देशात कुठेही भाजपासाठी अनुकूल वातावरण नाही. दक्षिणेकडे त्यांना दारे बंद करण्यात आली आहेत. तरीही भाजपकडून चारशे पारचा नारा कशाच्या आधारावर दिला जातो, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. भाजपच्या प्रचार काय करतो, विरोधी पक्ष मांस, मासे खाणारा आहे. व्हेज, नॉनव्हेज यावर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठी दिलेला लढा आहे. पुढची ५० वर्षे एखादा हुकूमशहा सांगणार का तुम्ही कुठले आणि कुठल्या रंगाचे कपडे घालायचे? मांसाहार करायचा की शाकाहार? व्हेज- नॉनव्हेजवर भाजपचा प्रचार सुरू आहे. पण आपल्या व्हेज- नॉनव्हेजवर बोलणारे डेली वेजवर बोलत नाहीत, असा टोला त्यांनी मारला.