जनतेसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट अन् मंत्र्यांच्या गाड्यांवर वारेमाप खर्च; भाजपाचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 20:06 IST2020-07-29T20:04:47+5:302020-07-29T20:06:28+5:30
मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

जनतेसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट अन् मंत्र्यांच्या गाड्यांवर वारेमाप खर्च; भाजपाचं टीकास्त्र
मुंबईः कोरोना संकट काळात राज्य सरकारने सरकारी तिजोरीतून राज्यातील अनेक वर्गांना आर्थिक मदत नाकारली, आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे निमित्त सांगून राज्यातील विकासकामांनाही स्थगिती दिली. मात्र दुसरीकडे मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना संकट काळात बाराबलुतेदारांचे व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर मिळत नसल्याने त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे, आदिवासी बांधवांचे खावटी कर्जाचे अजून वितरण केलेले नाही, कोरोना योद्धे पोलीस, डॉक्टर, रुग्णसेविका यांचे पगार वेळेवर होत नाहीत, राज्यातील अनेक छोटे उद्योग अडचणीत आहेत, वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना फटका बसलेला आहे, त्यावर अजूनही तोडगा काढलेला नाही, काटकसरीचे धोरण या गोंडस नावाखाली राज्यातील विकास कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे.
अशा सर्व समस्या असताना सरकार मात्र मंत्र्यांच्या आलिशान गाड्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. याआधी ही राज्य सरकारने शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा गाड्यांची परवानगी दिलेली आहे. तेव्हा सरकारकडे फक्त मंत्र्यासाठी पैसा आहे का, असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.