भाजपा जागा राखणार; शिवसेनेची जागा वाढणार; जाणून घ्या, विधान परिषदेत कोणत्या पक्षाचे किती आमदार होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 13:18 IST2020-05-01T13:14:37+5:302020-05-01T13:18:06+5:30
विधानसभेतील प्रत्येक पक्षाची सदस्यसंख्या आणि मतांच्या समीकरणांनुसार प्रत्येक पक्षाला विधान परिषद निवडणुकीत ९ पैकी किती जागा मिळतील याची आकडेवारी समोर आली आहे.

भाजपा जागा राखणार; शिवसेनेची जागा वाढणार; जाणून घ्या, विधान परिषदेत कोणत्या पक्षाचे किती आमदार होणार?
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विधानसभेतील प्रत्येक पक्षाची सदस्यसंख्या आणि मतांच्या समीकरणांनुसार प्रत्येक पक्षाला विधान परिषद निवडणुकीत ९ पैकी किती जागा मिळतील याची आकडेवारी समोर आली आहे.
सध्या विधानसभेमध्ये भाजपाचे १०५ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. इतर पक्षांकडे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार असल्याने प्रत्येक सदस्याला निवडून येण्यासाठी २९ मते मिळवणे आवश्यक आहेत. २९ मतांचा कोटा असेल त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोघे निवडून येतील, भाजपकडून तीन जण आमदार होतील.
सर्व पक्षांच्या संभाव्य उमेदवारांचा विचार केल्यास शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांच्यासोबत नीलम गोरे यांचे नावे असेल,असे सांगितले जात आहे. भाजपकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यात स्पर्धा असेल असे बोलले जात आहे. राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी दिल्यामुळे, पुन्हा त्याच समाजातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल का? अशीही चर्चा आहे. कदाचित यापेक्षा वेगळे ही नाव येईल. राष्ट्रवादी मधून हेमंत टकले आणि किरण पावस्कर इच्छुक आहेत.
ज्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याबाबतची सुचना केली आहे त्याबाबत
रिक्त झालेल्या जागा
भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १
निवृत्त झालेले सदस्य
शिवसेना
१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)
भाजप
१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस
१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर
काँग्रेस
१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)
पक्षीय बलाबल
भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३
निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते.