'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:41 IST2025-12-20T06:39:53+5:302025-12-20T06:41:15+5:30
भाजप आणि शिंदेसेनेतील मुंबई महापालिका जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली नाही.

'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
मुंबई : भाजप आणि शिंदेसेनेतील मुंबई महापालिका जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली नाही. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या सर्व ८२ जागांवर भाजपने दावा केला असून, शिवसेनेने मिळविलेल्या ८४ जागा देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुरुवारी जागावाटपाबाबत चर्चेची दुसरी फेरी पार पडली. दरम्यान, शिंदेसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पक्ष स्वबळावर लढणार नाही, तर महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपने पहिल्या बैठकीत शिंदेसेनेला केवळ ५२ जागांची ऑफर दिली होती. याला प्रत्युत्तर म्हणून गेल्या निवडणुकीतील ८४ जागा आणि अतिरिक्त जागांसह एकूण १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, २०१७मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढली होती आणि सध्या ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद अधिक असल्याचा युक्तिवाद करत भाजपने शिंदेसेनेला त्या ८४ जागा देण्यास नकार दिला.
१५७चा निर्णय झाला, ७० जागांवर तिढा कायम
भाजपने गेल्या आठ वर्षात ज्या प्रभागांमध्ये आपली ताकद वाढवली आहे किंवा इतर पक्षांमधून माजी नगरसेवक पक्षात घेतले आहेत, अशा जागांवरही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या १०२ आणि शिवसेनेच्या ५५ जागांवर प्राथमिक एकमत झाल्याचे समजते.
एकूण १५७ जागांचा निर्णय झाला. अद्याप सुमारे ७० जागांवर तिढा कायम आहे. पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा बैठक होणार असून, अडचणीच्या जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे महायुतीने याआधीच स्पष्ट केले आहे.
शिंदेसेनेच्या प्रवक्त्त्या शीतल म्हात्रे यांनी शिंदेसेना २२७ जागांवर लढणार असल्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे. त्या म्हणाल्या, ही माहिती खोटी असून, अशी कुठलीही गोष्ट नाही. मुंबईमध्ये शिंदेसेना आणि भाजपची युती ही अभेद्य आहे. आम्ही महायुती म्हणूनच मुंबईवर मराठी महापौर बसविणार आहोत. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना मी सांगू इच्छिते की, दोन ते तीन दिवसांतच महायुतीची गोड बातमी कळेल.