Join us  

MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:33 PM

Maharashtra Monsoon Session 2023: उद्योजक, इन्वेस्टरच्या कल्याणासाठी एमआयडीसीची त्याच ठिकाणी हवी, अशी मागणी केली जातेय का, अशी विचारणा करण्यात आली.

Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भर पावसात विधानसभेच्या प्रांगणात ज्या जमिनीवर एमआयडीसी मंजूर करावी म्हणून आंदोलन केले होते, ती जमीन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून लंडनमध्ये पळालेल्या नीरव मोदीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या प्रकरणी शासनाने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, भाजप नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी ही जागा नीरव मोदीची असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधान परिषदेतील एका चर्चेदरम्यान राम शिंदे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. या भागात एमआयडीसी केली जावी याबद्दल कोणाचे दुमत नाही. येथील बेरोजगाराला काम मिळाले पाहिजे. मात्र या जागेवर, याच ठिकाणी एमआयडीसी व्हावी असा आग्रह काहीजण का करतात, असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला. 

उद्योजक आणि इन्वेस्टर यांच्या कल्याणासाठी एमआयडीसी करत आहोत का?

येथील जमिनींचे मालक असलेल्या शेतकऱ्यांची नावे नीरव दीपक मोदी, मनिषा कासोले, नयन अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल आदी असून आपण येथील बेरोजगारांना काम मिळावे यासाठी एमआयडीसी करत आहोत की येथील उद्योजक आणि इन्वेस्टर यांच्या कल्याणासाठी एमआयडीसी करत आहोत, अशी विचारणा राम शिंदे यांनी सभागृहात चर्चेवेळी केली. काहीजण समाज माध्यमांतून कर्जत एमआयडीसीसाठी जिंदाल, एशियन पेंट्स, अदानी आदी कंपन्यांबरोबर चर्चा झाल्याचे म्हणणे प्रसारित करत आहेत. ही मंडळी जर कर्जतमध्ये भविष्यात होणाऱ्या एमआयडीसीमध्ये यायला तयार आहेत, तर मग त्यांना जामखेडचा रस्ता सापडला नव्हता का, जामखेडमध्ये एमआयडीसी होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. परंतु अद्याप तेथे एकही उद्योग आलेला नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चेला दिले उत्तर

या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, जामखेड एमआयडीसीत उद्योग कसे येतील यादृष्टीने प्रयत्न केले जातील. सन २०१६ मध्ये कर्जत एमआयडीसीसाठी पहिली बैठक झाली. त्यानंतर स्थळपाहणी झाली. भूनिवड समितीनेसुद्धा सकारात्मकता दाखवली. तत्कालीन मृद् व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्र दिले. कर्जत, पाटेगाव, खंडाळा या भागाची भूनिवड समितीने पाहणी केली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

दरम्यान, जर येथील जमिनीचे मालक नीरव मोदी आणि अग्रवाल असे असणार असतील तर हे सगळे  धक्कादायक आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची आहे? हे नीरव मोदी कोण आहेत?  लंडनला पळालेले नीरव मोदी आहेत का, या सर्वांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या जागेला जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. याच भागात माळढोक पक्षी अभयारण्य तसेच त्याची बफर जागाही आहे. ही जागा वगळता वन्यजीव संरक्षणाचा कायदा लक्षात घेऊन उरलेली जमीन सलग आहे का, याचीसुद्धा तपासणी होणे गरजेचे आहे. या साऱ्याचा विचार करून त्यानंतरच येथील एमआयडीसीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३रोहित पवारराम शिंदेविधान परिषद