Join us  

'दाऊदला परत भारतात आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय झालं?' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 12:17 PM

शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु आहे.

मुंबई - भाजपा नेते मोहित भारतीय यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केल्याने शिवसेना नेत्यांनीही भाजपाला धारेवर धरले आहे. आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, आता दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असं मोहित भारतीय यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भाजपाला सवाल केला आहे. 

सचिन अहिर यांनी ट्विट करुन सांगितल आहे की, राज्यात सत्ता गेल्यामुळे भाजपा नेते मोहित भारतीय दु:खी झाले आहेत. शिवसेना तुमच्यासोबत युतीमध्ये होती तेव्हा काम करु दिलं नाही, आता शिवसेना काम करतेय त्यावर टीका करत आहात. तसे, भाजपने दाऊदला भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले, त्यावरील काही अपडेट्स मिळतील का? असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे. 

त्यावर मोहित भारतीय यांच्याकडूनही उत्तर देण्यात आलं आहे. मोहित भारतीय यांनी ट्विटमध्ये सांगितले की, तुमच्या म्हणण्यानुसार सर्व विकासाचे प्रकल्प सुरु झाले त्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे आहे. असं अप्रत्यक्षरित्या तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. मेट्रो, कोस्टल रोड, हायवे, सिंचन असे प्रकल्प सुरु करण्यामागे शिवसेनेचा हातभार नव्हता असं स्पष्ट होतं असा चिमटा त्यांनी काढला आहे. 

युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य जय सरपोतदार यांनीही मोहित भारतीय यांच्यावर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलंय की, मोहित भारतीय यांना पर्यावरणप्रेमी आणि दहशतवादी यांच्यातील फरक माहित नसावा हे स्पष्ट होतं. तसेच त्यांनी ज्या संधीचा उल्लेख केला आहे. त्याचा फायदा तुम्हीच उचलला पाहिजे असा टोलाही जय सरपोतदार यांनी भाजपा नेते मोहित भारतीय यांना लगावला आहे.

मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याचा टोला भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केला होता. 

याबाबत मोहित भारतीय यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.  

टॅग्स :सचिन अहिरशिवसेनादाऊद इब्राहिमभाजपाउद्धव ठाकरे