BJP Mumbai Mahapalika Election News: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता जिल्हाशः पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी केली.
या सदस्यांना ७ जुलै २०२५ पर्यंत भाजपा मुंबईं कार्यालयात अहवाल सादर करावा लागणार आहे. आढावा घेण्यासाठी उत्तर मुंबई जिल्ह्याची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमित साटम आणि विद्या ठाकूर घेणार आहेत.
उत्तर पूर्व जिल्ह्याचा आढावा मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून, उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी पराग अळवणी आणि संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनील राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
दरम्यान, निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकूण २७ सदस्यांच्या या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.