“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:56 IST2025-07-02T17:53:43+5:302025-07-02T17:56:21+5:30
BJP Narayan Rane News: शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना मराठी आठवली नाही का? आताच कशी काय आठवली? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
BJP Narayan Rane News: ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली, त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी संपवली. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आताच त्यांना मराठी कसे आठवले? उद्धव ठाकरे दोन दिवस मंत्रालयात आले. मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केले? अशी विचारणा भाजपा नेते नारायण राणे यांनी केली.
सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धवसेनेच्या विजयी मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ अखेर निश्चित झाली. मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे 'ठाकरे ब्रँड'चे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.यातच विधानभवनात पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?
उद्धव ठाकरे काही झाले तरी राज ठाकरे यांना पक्षात स्थान देणार नाहीत. कारण तसे झाले तर उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल. उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरे यांना देणार का? उद्धव ठाकरे यांनी कुटुंब म्हणून किती जणांना जवळ केले? राज ठाकरे पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी खूप छळले. राज ठाकरे यांना पक्ष सोडण्याची इच्छा नसताना पक्ष सोडायला भाग पाडले, या शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील. उद्धव ठाकरे नगण्य राहातील, पण शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ओरिजनल आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळाले नसल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. ५ जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असे मला अजूनही वाटत नाही. कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणे आवश्यक आहे. ५ जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली.