भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:56 IST2025-06-01T07:55:15+5:302025-06-01T07:56:05+5:30

२२ जिल्हाध्यक्ष जाहीर, जुन्या भाजप नेत्यांनाच संधी

BJP Mumbai President tussle continues Palghar Vasai-Virar along with three parts of Mumbai get district presidents | भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली. मात्र, मुंबई अध्यक्ष कोण? हा तिढा कायम आहे. त्या संबंधीची घोषणा दिल्लीतून होणार आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी आ. प्रवीण दरेकर यांचे नाव आघाडीवर आहे. आ. अमित साटम, माजी आमदार सुनील राणे यांच्या नावांचीही चर्चा आहे.

विद्यमान अध्यक्ष व राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, अशी चर्चा असली तरी खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, तसे होण्याची शक्यता नाही. प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. त्याच न्यायाने शेलार यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल, असे मानले जाते. 

जुन्या भाजप नेत्यांनाच संधी

नांदेडमध्ये माजी आमदार अमर राजूरकर यांना महानगर अध्यक्षपद आधीच देण्यात आले आहे, ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. तथापि, नांदेड उत्तर - ॲड. किशोर देशमुख आणि नांदेड दक्षिण - संतुकराव हंबर्डे या जुन्या भाजप नेत्यांनाच संधी देण्यात आली. हंबर्डे हे गेल्यावर्षी लोकसभा पोटनिवडणुकीत कमी मतांनी पराभूत झाले होते. लातूर ग्रामीणचे अध्यक्षपद काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांना देण्यात आले. लातूर शहरचे नवे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर हे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर यांचे पुत्र आहेत. 

मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर असे दोन बडे नेते असलेल्या चंद्रपूरमध्ये शहराचे अध्यक्षपद अहीर यांचे निकटवर्ती सुभाष कासमगट्टावार यांना, तर ग्रामीणचे अध्यक्षपद मुनगंटीवार समर्थक हरीष शर्मा यांना देण्यात आले. बीडमध्ये कार्यकारी अध्यक्ष असलेले शंकर देशमुख अध्यक्ष झाले, ते मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती आहेत. अहिल्यानगरचे अध्यक्ष अनिल मोहिते हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे जवळचे आहेत. कोल्हापूर शहरचे अध्यक्ष विजय जाधव हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्ती आहेत. 

जाहीर झालेले अध्यक्ष

  • उत्तर -पश्चिम मुंबई    ज्ञानमूर्ती शर्मा
  • दक्षिण-मध्य मुंबई    नीरज उभारे 
  • दक्षिण मुंबई    शलाका साळवी
  • पालघर    भरत राजपूत
  •  वसई- विरार     प्रज्ञा पाटील
  • अहिल्यानगर शहर    अनिल मोहिते
  • नाशिक शहर    सुनील केदार
  • नाशिक दक्षिण    सुनील बच्छाव
  • नाशिक उत्तर    यतीन कदम
  • पुणे दक्षिण (बारामती)    शेखर वढणे
  • कोल्हापूर शहर    विजय जाधव
  • गडचिरोली    रमेश बारसागडे
  • चंद्रपूर शहर    सुभाष कासमगट्टावार
  • चंद्रपूर ग्रामीण    हरीष शर्मा
  • वर्धा     संजय गाते
  • परभणी ग्रामीण    सुरेश भुंबरे
  • छत्रपती संभाजीनगर    किशोर शितोळे
  • लातूर शहर    अजित पाटील कव्हेकर
  • लातूर ग्रामीण    बसवराज पाटील
  • नांदेड उत्तर    ॲड. किशोर देशमुख
  • नांदेड दक्षिण    संतुकराव हंबर्डे
  • बीड    शंकर देशमुख

Web Title: BJP Mumbai President tussle continues Palghar Vasai-Virar along with three parts of Mumbai get district presidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.