Join us

शंकेखोरांचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा ठाकरे गटाला टोला

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 11, 2023 14:38 IST

मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे. आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत.

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने 'शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच - वाघ नखांच्या निमित्ताने' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान तर शाहीर नंदेश उमप यांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम गुरुवारी (ता.१२) रोजी सायंकाळी ५.३० वा. दादर (प.) येथील स्वा. सावरकर सभागृहात होईल.

यावेळी बोलतानाआ. ॲड. आशिष शेलार म्हणाले की, लंडनमधील संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणण्याचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये वाघनखे तीन वर्षांसाठी येणार आहेत. मुंबई, नागपूर, सोलापूर सातारा  यासह महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये या शौर्य पराक्रमी वाघनखे जनतेसाठी खुली असतील.काही शंकेखोर टवाळांनी यावर शंका व्यक्त केली आहे. ज्यांच्या मनात, बुद्धीत टवाळक्या करणे याशिवाय दुसरं काही नाही, अशा पक्षातील नेत्यांनी म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी यावर प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. तो कोथळा विचारांचा असेल. ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळत आहे त्यांनी आपल्या बुद्धीत भर घालण्यासाठी कार्यक्रमाला यावे, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

आदित्य ठाकरेंच्या बाबतीतील प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले की,झोपी गेलेल्याना उठवता येईल पण झोपेचे सोंग घेतलेल्या नाही. आदित्य यांना बुद्धीग्रहण आणि अजून माहिती घेण्याची इच्छा असेल त्यांना सन्मानाने नक्की बोलवू. आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहे. शंका सहज घेतली जात नाही. विशिष्ट वर्गाची मते येणाऱ्या लोकसभेला, महानगरपालिकेला आपल्याला मिळाली पाहिजेत, यासाठी हे होत आहे. मतांसाठी लांगूलचालन सुरू आहे म्हणून अफजलखानाचा कोथळा काढला हे नको, तो इतिहास नको, वापरलेली वाघनखे नको, ती वाघनखे खरी आहेत का? अशी शंका विशिष्ट वर्गाला बरं वाटण्यासाठी उपस्थित केली जाते. हे सगळं नियोजित असल्याचा आरोप त्यांनी केला.

 मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे. आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत. त्याच्यावर कोण काळे लावत नाही. त्याची मोडतोड करत नाहीत. आज डोंगरी आणि पाथमोडी रस्त्यावर न जाणारे घाटकोपरला गुजराती शब्दांवर तोडफोड करायला चालले आहेत. हिंमत आहे तर डोंगरीला जा..! अजूनही तिथे बोर्ड आहेत. तिकडे तोडफोड करा, काळं फासा... विशिष्ट वर्गाची मते हवेत म्हणून तिकडे जायची हिंमत यांच्यात नाही. हिंदू एकत्र येत असल्याने यांच्या पोटात दुखत आहे. त्यामध्ये विघटन होण्यासाठी प्रयत्न केले जात असून हिंदू एकतेच्या विरोधात उबाठा गटाचे प्रयत्न असल्याचे ॲड. आशिष शेलार म्हणाले.

टॅग्स :आशीष शेलारआदित्य ठाकरेभाजपा