Join us  

"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी

By मुकेश चव्हाण | Published: January 28, 2021 1:54 PM

रक्षा खडसे म्हणाल्या की, झालेल्या प्रकार हा वाईट आणि विचित्र होता.

मुंबई: भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र हा सर्व गोंधळ गुगल भाषांतरामुळे निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल', असा इशारा अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे. त्यातच आता स्वत: रक्षा खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

रक्षा खडसे म्हणाल्या की, झालेल्या प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला म्हणून, एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटलं, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं. तसेच प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले. 

भाजपाकडून हे करण्यात आलेलं नाही. माझ्याकडे जे मेसेज आले आहे. त्यामध्ये 'सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी' या पेजवरून याचे स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहे. हे पेज कोण चालवत आहे, ते माहिती नाही. या पेजवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली, असा आरोपही रक्षा खडसे यांनी यावेळी केला आहे. 

चावटपणा करणाऱ्याला आत टाका- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील

भाजपाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली. असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 

गुगल भाषांतरामुळे गोंधळ!

प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, रावेर (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे. तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन हिंदीत भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. त्यामुळे या भाषांतरातूनच हा सारा गोंधळ झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :भाजपामहाराष्ट्रपोलिसअनिल देशमुख