Join us  

'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहीत आहे, पण...'; पूनम महाजन कडाडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 3:31 PM

शकुनींनी महाभारत घडवलं आणि विचारांच्या आणि जनतेच्या विरोधात सत्तेत जाऊन बसले. अशी टीका पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

मुंबई- आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या 'जागर मुंबई' मेळाव्याला मुंबईतील वांद्रे पूर्वेपासून सुरुवात झाली आहे. यावेळी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी भाषण करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

पूनम महाजन म्हणाल्या की, युतीत भांडणे झाली, महाभारत झालं. परंतु हे महाभारत घडवणारे शकुनी कोण-कोण होते, हे तुम्हाला माहितीच असेल. शकुनींनी महाभारत घडवलं आणि विचारांच्या आणि जनतेच्या विरोधात सत्तेत जाऊन बसले. अशी टीका पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

मला माहितीय जेव्हा मी शकुनी म्हणेल तेव्हा वेगवेगळ्या पक्षातील सज्जन माझ्यावर बोटं करतील आणि बोलतील तु कोण आहे बोलणारी...हे सज्जन माझ्या घराबाहेर आणि ऑफिसबाहेर पोस्टर लावून म्हणतील, 'तुझ्या बापाला कोणी मारलं याचं उत्तर आधी दे'...पण त्या सज्जनांना मी सांगू इच्छिते की, माझ्या बापाला कुणी मारलं हे मला माहिती आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस हाच प्रश्न उपस्थित केल्याने मला फरक पडत नाही. पण त्याच्यामागील मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही तेव्हा सत्तेत होतात. तुम्ही तेव्हा शोधून का दाखवलं नाही?, असा सवाल पूनम महाजन यांनी उपस्थित केला. पूनम महाजन यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

दरम्यान, मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? पण तुम्हाला याचा विसर का पडलाय की गुजरातचा भाजपाचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरात मध्ये मराठी माणसाने हा झेंडा फडकवला, त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे, असं पूनम महाजन यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :पूनम महाजनभाजपाउद्धव ठाकरे