Join us

महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे

By मुकेश चव्हाण | Updated: January 20, 2021 11:04 IST

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मुंबई: मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असही उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरुन आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. 

नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना अर्थखात्याचा अभ्यास नाही. भांडवल किती आहे?त्यांना आकडेवारी द्यायला सांगा. राज्य कसं चालतं? कशावर चालतं? याचा मुख्यमंत्र्यांना अभ्यास नाही. राज्याच्या तिजोरीत किती पैसै आहेत? राज्याची अर्थव्यवस्था काय आहे, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी या प्रश्नांचे उत्तर घराबाहेर पडून सांगावं, असं आव्हान नारायण राणे यांनी दिले आहे. 

नारायण राणे पुढे म्हणाले की, आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच झेंडा फडकेल. भाजपानं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो, असं नारायण राणे म्हणाले. तसेच  महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे. लोकांना आता तीन पक्षांची भांडण कळायला लागली आहेत. तसेच या सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

दम्यान, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात, पण...- देवेंद्र फडणवीस

कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहे, हे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. 'उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात. पण ते जेव्हा कार चालवत असतात, तेव्हा सगळं ट्रॅफिक थांबलेलं असतं. त्यामुळेच ती कार व्यवस्थित चालते. सरकार मात्र अशा पद्धतीनं चालवता येत नाही. सरकारकडे ट्रॅफिक सुरूच राहतं. यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटतं आहे,' असा टोला फडणवीसांनी हाणला.

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती- नारायण राणे

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती. कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिलेला नाही, असे नारायण राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे महाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारशिवसेनाभाजपाग्राम पंचायत