Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:23 IST

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी स्वस्तातील प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण केली. चित्रपट क्षेत्रातील लोकांना शिवीगाळ केली. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. राज ठाकरेंनी २००७ पासून २०२०-२१ पर्यंत योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आज त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झाले आहे. ते अयोध्येला येत आहेत, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही, असं मनसेचे नेते अभिजीत पानसे म्हणाले. ब्रिजभूषण सिंह यांनी स्वत:च्या प्रसिद्धिसाठी हा प्रकार केला आहे, आणि त्यानूसार त्यांना प्रसिद्धिही मिळाल्याटे अभिजीत पानसे यांनी सांगितले. तसेच महत्वाची बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेला असून त्यांना शांत बसायला सांगितले आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह शांत होतील, असा दावाही अभिजीत पानसे यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राज ठाकरे अजानचा विरोध करोत, अथवा हनुमान चालिसाचं पठण करोत, त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नाही, माझी व्यक्तिगत भूमिका आहे. मी उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीय म्हणून राज ठाकरे यांनी आमचा अपमान केला आहे. श्रीरामही उत्तर भारतीय होते. याच भगवान राम यांच्या वंशजांना मागील २० वर्षे सातत्याने ज्या व्यक्तीने मारहाण करण्याचे, अपमानित करण्याचे काम केले त्यांनी यासाठी माफी मागावी. त्यांनी अयोध्येत येण्याला आमचा आक्षेप नाही, अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. 

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमी-

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमी आहे. मराठ्यांनी देशासाठी पानिपतसारखे युद्ध लढले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जातीचं सैन्य होतं. याच शिवाजी महाराजांच्या धर्तीवर राज ठाकरे नावाचा माणूस मराठी विरुद्ध उत्तर भारतीय राजकारण करतो. स्वस्त लोकप्रियतेसाठी गरीब टॅक्सी चालकांना मारतो‌. अशा व्यक्तिला मी माफ करणार नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेयोगी आदित्यनाथउत्तर प्रदेशअयोध्या