गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:49 IST2025-07-02T09:24:00+5:302025-07-02T09:49:35+5:30
गोंदियाला एकदाही पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. मला पत्रकारांना सांगावे लागेल. एक अधिकारी पूर्ण रक्कम घेऊनच काम करतो, असाही अग्रवाल यांचा आक्षेप होता.

गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
मुंबई : रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना भाजपचे गोंदिया येथील आमदार विनोद अग्रवाल यांच्या रोषाचा मंगळवारी विधानभवन परिसरात सामना करावा लागला. आपल्या मतदारसंघातील रोजगार हमी योजनेतील झालेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप करीत अग्रवाल हे गोगावले यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
गोंदियाला एकदाही पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. मला पत्रकारांना सांगावे लागेल. एक अधिकारी पूर्ण रक्कम घेऊनच काम करतो, असाही अग्रवाल यांचा आक्षेप होता. गोगावले हे म्हणाले, ‘अरे थांबा रे, जाऊ नकोस! मी ऐकतोय सगळे.’ यावेळी गर्दीही जमली होती.
एक पैसाही मिळाला नाही
राज्यभरात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाचे सुमारे ४,१८५ कोटी रुपये अद्याप
देण्यात आलेले नाहीत. यापैकी फक्त १,३७९ कोटी रुपये वितरणासाठी जारी करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्याचे ४०७ कोटी रुपये थकीत आहेत.
वाटप केलेल्या निधीतून आमच्या जिल्ह्याला किमान १३३ कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु गोंदिया जिल्ह्याला एक पैसाही मिळालेला नाही. मी मंत्री गोगावले यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आमच्या गोंदिया जिल्ह्यावर अन्याय झाल्याची भावनाही त्यांच्याकडे व्यक्त केली आहे, असे अग्रवाल यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना फक्त १०-१५ टक्के निधी देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांना ५० टक्क्यांहून अधिक निधी देण्यात आला आहे. आम्ही, विदर्भाचे आमदार, अशा प्रकारचा भेदभाव सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.