Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पत्रात भाजप आमदाराचा 'भूमाफिया' उल्लेख ; पटोलेंच्या आरोपांवर नरेंद्र मेहता म्हणाले, "माझ्या शत्रूंनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:10 IST

नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Narendra Mehta vs Nana Patole: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका पत्राने मोठा भूकंप घडवून आणला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख चक्क एका अधिकृत सरकारी पत्रात भूमाफिया असा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महसूल विभागाच्या या पत्राने भाजपची कोंडी झाली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे.

नाना पटोले यांनी माध्यमांसमोर एक पत्र सादर केले, जे २० जून २०२५ रोजी महसूल विभागाने जारी केले आहे. या पत्रात ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन’चे मालक नरेंद्र लालचंद मेहता यांनी मुद्रांक शुल्क आणि दंड थकवल्याचा उल्लेख आहे. पटोले यांच्या दाव्यानुसार, या पत्रात मेहता यांचा उल्लेख स्पष्टपणे भूमाफिया असा करण्यात आला असून त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे. "भाजपच्या मंत्र्यांनीच आपल्या पक्षातील भूमाफिया ओळखले आहेत, आता त्यांनी कारवाई करून दाखवावी," असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

या आरोपांना उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "मंत्री म्हणून काम करताना जेव्हा एखादे निवेदन किंवा तक्रार येते, तेव्हा त्या निवेदनातील विषयाचा संदर्भ घेऊनच पत्र पुढे पाठवावे लागते. तक्रारदाराने जो शब्द वापरला, तोच पत्रात आला आहे. यात कुठेही आमदार असा उल्लेख नाही, फक्त नाव आहे. पटोले हे केवळ राजकारण करत आहेत," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केले की, मेहता यांच्याविरुद्ध आतापर्यंत १५ तक्रारी आल्या आहेत, त्यापैकी १०-१२ प्रकरणांत ते निर्दोष सुटले आहेत. तरीही लोकशाहीत तक्रारीची दखल घेणे मंत्र्यांचे कर्तव्य असल्याने सात दिवसांत चौकशीचे आदेश दिले आहेत.

आमदार नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया

स्वतःवर होणारे सर्व आरोप फेटाळताना आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की, "मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. माझी कोणतीही थकबाकी शासनाकडे प्रलंबित नाही. नाना पटोले यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून ते केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत."

"नाना पटोले यांनी लावलेले आरोपी बिनबुडाचे आहेत. माझ्या राजकीय शत्रूंनी भूमाफिया असे हेडिंग टाकून हे पत्र मंत्री महोदयांना दिले. मंत्री महोदयांनी याची चौकशी करण्यास सांगितलं. माझा किंवा माझ्या कंपनीचा कुठलाही स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा झालेला नाही. विरोधक बोलत आहेत की सरकारने फायदा पोहोचवण्यासाठी ही स्कीम आणली. नाना पटोले सभापती असताना त्यावेळी ही स्कीम आली. त्यामुळे ते स्वतः कबूल करत आहेत की महाविकास आघाडीने बिल्डरांना मदत करण्यासाठी स्कीम आणली होती. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. वेगवेगळ्या महापालिकांमध्ये विविध स्कीम असतात ज्यांचे पैसे बाकी असतात ते भरून भरपाई करतात, याच्यामध्ये कुठलाही घोटाळा नाही," असं नरेंद्र मेहता म्हणाले.

"आमच्या इथे चार-पाच लोक आहेत जे ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. १०० टक्के कुठलेही मुद्रांक शुल्क बाकी नाही, नाना पटोले मोघम आरोप करत आहेत," असंही नरेंद्र मेहतांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP MLA Called 'Land Mafia' in Official Letter; Mehta Responds

Web Summary : Controversy erupts after a government letter labels BJP MLA Narendra Mehta a 'land mafia'. Nana Patole alleges BJP protects land grabbers. Mehta denies charges, blaming political rivals and claiming full compliance with stamp duty payments. An investigation has been ordered.
टॅग्स :नाना पटोलेचंद्रशेखर बावनकुळे