Join us

आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे BMC ची भ्रष्टाचारी ओळख; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 15:46 IST

नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दूर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे असं नितेश राणेंनी म्हटलं.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना यांच्यातील कलगीतुरा वाढतच चालला आहे. आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे मुंबई महापालिका सातत्याने भ्रष्टाचारासाठीच चर्चेत राहिली आहे. पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून तुमच्यावर आहे असं सांगत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. 

नितेश राणे यांनी पत्रात म्हटलंय की, मुंबई उच्च न्यायलायाने घाटकोपर येथील पश्चिम किरोळ गावातील एका इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत जलवाहिनीची सुविधा नसताना महापालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) दिले. यावर महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात असं त्यांनी सांगितले आहे. 

त्यामुळे नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दूर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपा सातत्याने आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून आले आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही भाजपा आमदारांनी बीएमसीतील भ्रष्टाचारावर सभागृहात गंभीर आरोप केले. 

कॅग ऑडिट करून होणार चौकशीमुंबई महापालिकेत काही कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकाराची विशेष कॅग (महालेखापाल) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या हातात अनेक वर्षे असलेल्या महापालिकेतील घोटाळे आता चौकशी व कारवाईच्या रडारवर असतील. मुंबईशी निगडित प्रश्नांसंबंधी सत्ताधारी पक्षातर्फे चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे असून त्याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी या चर्चेत सहभागी होताना केली होती. त्याची दखल घेत फडणवीस म्हणाले, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तर रातोरात कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून कंत्राटे मिळविली आहेत. कोविड सेंटरमध्येही घोटाळे आहेत. रस्ते बांधण्यासाठी स्थानिक कंत्राटदार हा पात्र ठरतो, मात्र एल अँड टी सारखी मोठी कंपनी पात्र ठरत नाही. भेंडीबाजारातील इमारतींच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, तो कोणी तरी रद्द केला. यातदेखील भ्रष्टाचार झालाय. मुंबई महापालिकेतील काही कामांमध्ये तर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळविण्यात आला आहे. या गैरव्यवहारांची स्पेशल कॅग नेमून चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेनीतेश राणे मुंबई महानगरपालिकादेवेंद्र फडणवीस