"पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू"; भाजपा आमदार अतुल भातखळकरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 01:21 PM2021-07-17T13:21:05+5:302021-07-17T13:39:22+5:30

Atul Bhatkhalkar : भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला.

BJP MLA Atul Bhatkhalkar Arrested by Mumbai Police, Aarey Police Station | "पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू"; भाजपा आमदार अतुल भातखळकरांना अटक

"पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू"; भाजपा आमदार अतुल भातखळकरांना अटक

Next
ठळक मुद्देकुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुंबई : एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. 

या कारवाईविरोधात भाजपा चांगलीच आक्रमक झाली. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

"ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत", असे अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

"मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?", असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

याचबरोबर, अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर ट्विटद्वारे हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी... हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू." 

दरम्यान, कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे 150 रहिवाशांना मुंबई पालिकेने घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar Arrested by Mumbai Police, Aarey Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.