Join us  

“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”; BJPची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 9:50 AM

BJP Vs Uddhav Thackeray Group: न्याय यात्रा सभेतील भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? अशी विचारणा भाजपाने केली आहे.

BJP Vs Uddhav Thackeray Group: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला उपस्थित राहिले. सर्वच विरोधी पक्षांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. भाजपाचा पराभव करण्याचा निर्धार बोलून दाखवला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला.

भाजप एक फुगा आहे. मला खेद वाटतो की या फुग्यात आम्ही हवा भरली. दोन खासदार होते, आज ४०० पारचा नारा देत आहेत. संविधान बदलण्यासाठी, देशाचे नाव बदलण्यासाठी यांना ४०० पार हवे. देश वाचला पाहिजे. व्यक्तीची ओळख ही देश असला पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी देश मोठा असला पाहिजे. कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठी असला तरी ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशाहीचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या सभेत हल्लाबोल केला. मात्र, सभेतील भाषणाला ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पलटवार केला.

सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बावनकुळे म्हणतात की, आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला?

भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका करताना काही प्रश्न उपस्थित केले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आशिष शेलार म्हणाले की, आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल "मर्दा"सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने "हिंदुत्वाला केले तडीपार" हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच "शिवतीर्थावर" सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल", आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!!, या शब्दांत आशिष शेलार यांनी पलटवार केला.

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळेआशीष शेलारउद्धव ठाकरेभारत जोडो यात्रा