Join us  

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान

By मुकेश चव्हाण | Published: December 16, 2020 8:18 PM

आगामी 26 जानेवारीपर्यंत भाजपाचा आमदार फोडून दाखवावा, असं आव्हानभाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. 

मुंबई: येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला होता. अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, अशी माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र आगामी 26 जानेवारीपर्यंत भाजपाचा आमदार फोडून दाखवावा, असं आव्हान भाजपाने दिले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. मात्र जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आता भाजपानेही राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर येत्या 26 जानेवारीपर्यंत भाजपचा आमदार फोडून दाखवावा, अन्यथा राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. 

माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश-

जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 

भाजपा सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू- अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांना राज्याचे अजित पवार यांनी 'घरवापसी'ची साद घातली आहे. "पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजपा तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू", असं गणित मांडून अजित पवार यांनी भाजपाच्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

'वनविरोधी लोकांना उकळ्या फुटायची गरज नाही'

बुधवारी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. याबाबत जयंत पाटील म्हणाले, "स्टे दिलेला असला तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन क्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्याजवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं आकांततांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत."

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारसुधीर मुनगंटीवारभाजपामहाराष्ट्र सरकार