Join us

फडणवीस आणि महाजनांनी खडसेंचं तिकीट कापलं?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:50 IST

एकनाथ खडसेंनी पक्षासाठी ४० वर्ष एकनिष्ठेने काम केले आहे. त्यांची नाराजी दूर झाली पाहिजे

ठळक मुद्देतर या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईलएकनाथ खडसे नाराज असू नये असं पक्षातील सगळ्यांना वाटतं. सत्ता येते अन् जाते पण कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्षाच्या विचारासाठी काम केलं पाहिजे

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा भाजपामधील नाराजी उफाळून आली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मोठ्या पदावर आहेत. ते असं काही करणार नाही. तर गिरीश महाजनही मंत्री होते त्यांनी खडसेंविरोधात काम करण्याची शक्यता नाही असं मत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले आहे. 

टीव्ही ९ मराठीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी असं कुठेही म्हटलं नाही की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्यांचे तिकीट कापलं. तिकीट देताना देवेंद्रजी आणि महाजन यांनी काही मत मांडलं एवढेच ते म्हणाले. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात काम केले त्याचे पुरावे एकनाथ खडसेंनी दिले आहेत. त्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे एकनाथ खडसे आणि पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचे आवाहन केलं होतं. खडसेंनी दिलेले पुरावे योग्य ठरले तर या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच एकनाथ खडसेंनी पक्षासाठी ४० वर्ष एकनिष्ठेने काम केले आहे. त्यांची नाराजी दूर झाली पाहिजे. पक्षाच्या विस्तारासाठी प्रत्येक कार्यकर्ता, नेता महत्वाचा असतो. एकनाथ खडसे नाराज असू नये असं पक्षातील सगळ्यांना वाटतं. चर्चेतून खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्ता येते अन् जाते पण कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्षाच्या विचारासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे एकनाथ खडसेंची नाराजी लवकरच दूर केली जाईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

पहिल्यांदाच एकनाथ खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत. पण, देवेंद्र फडणवीसांसोबत माझे संबंध बिघडलेत असं काहीही नाही. आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो, असेही खडसेंनी सांगितलं होतं.  देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करताना खडसेंनी कोअर कमिटीतील चर्चेचा संदर्भ दिला. 'कोअर कमिटीमध्ये तिकीट वाटपावर चर्चा झाली. त्यामध्ये 17-18 सदस्य होते. यातील अनेकजण माझ्या ओळखीचे होते. त्यांनी या बैठकीत झालेल्या घटनांची माहिती मला दिली. मला विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुढे काय झालं, याची तुम्हाला कल्पनाच आहे,' असं खडसेंनी म्हटलं होतं. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारभाजपाएकनाथ खडसेदेवेंद्र फडणवीसगिरीश महाजन