Join us  

"लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले"

By मुकेश चव्हाण | Published: October 05, 2020 12:43 PM

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे.

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या धक्काबुक्कीमुळे राहुल गांधी खाली पडले होते. या घटनेनंतर विरोधकांनी योगी सरकार आणि यूपी पोलिसांवर निशाणा साधला होता. मात्र राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच मागील सहा वर्षांपासून देशात भाजपाचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करुन गोरं होतं का, हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, अशी खोचक टीका देखील रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

नेमकी काय आहे घटना?

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले होते.  यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. 

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसमधील पीडित कुटुंबियांची भेट घेतलीच

हाथरसमधील तरुणीच्या पीडित कुटुंबियांची गुरुवारी भेट घेता आली नाही. त्यामुळे शनिवारी पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळीराहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील हाथरसकडे निघाले होते. मात्र दिल्ली - नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापटी सुरू असताना प्रियांका गांधी गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी पोलिसांना आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जपासून रोखण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या धुमश्चक्रीनंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासहीत केवळ पाच नेत्यांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला.

"त्यांना इतिहास माफ करणार नाही"

"राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल" असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :राहुल गांधीरावसाहेब दानवेहाथरस सामूहिक बलात्कारउत्तर प्रदेशपोलिसभाजपाकाँग्रेस