BJP leader Ram Kadam in police custody | भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव

भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव

ठळक मुद्देभाजपचे आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातपालघर हत्याकांडाप्रकरणी कदम यांनी केलं होतं मोर्चाचं आयोजनराम कदम यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबई
भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश यात्रे'चं आयोजन केलं होतं. राम कदम यांच्या निवासस्थानापासून या यात्रेला आज सकाळी सुरुवात होणार होती. पण राम कदम या यात्रेसाठी घराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता. कदम यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी राम कदम यात्रेसाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

'पोलिसांची ही कारवाई दुर्देवी असून सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे', अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली. 

पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न केल्याच्या निषेधात जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं राम कदम यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान राम कदम खार येथील आपल्या निवासस्थापासून यात्रेला सुरुवात करणार होते. पोलिसांनी यात्रेला सुरुवात होण्याआधीच राम कदम यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यात जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा संघटक संतोष जनाठे यांचा समावेश आहे. 

दरम्यान, राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी समज देऊन राम कदम यांना सोडले. राम कदम यांनी मात्र आपलं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

काय होतं पालघर प्रकरण?
कोरोनाला रोखण्यासाठी करण्याता आलेल्या लॉकडाउनच्या काळात पालघर येथे दोन साधूंसह तीन जणांची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडावरुन महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार टीकेची झोड उठवली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने १२६ आरोपींविरुद्ध सुमारे ११ हजार पानांची दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP leader Ram Kadam in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.