BJP Replied To Sanjay Raut: औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याने त्यांचे डोके ठिकाणावर नाही. मविआच्या नेत्यांना संपर्क केला की संजय राऊतांची चिडचिड वाढते. महाराष्ट्रातील मविआची पळताभुई थोडी होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्यगिरी आपण राज्यसभा निवडणुकीत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहिली आहे. त्याचमुळे संजय राऊत घाबरले आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला. राजनाथ सिंह हे राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत. मात्र, आमच्यासारख्या लोकांनी हुकूमशाही विरुद्ध लढण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही आम्हाला काही सांगू नये. तुम्ही एखादा मराठी माणूस उमेदवार म्हणून दिला असता तर त्यावर चर्चा झाली होऊ शकली असती. पण आता नाही. राहुल गांधी यांनी जे वातावरण देशात निर्माण केलेले आहे. त्यानंतर क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देताना पलटवार केला.
संजय राऊत पाकिस्तानचे प्रवक्ते, सैनिकांचा अपमान, माफी मागा
राजकारणात सौजन्य दाखवावे लागते. महाराष्ट्राचे पहिले नागरिक म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यायला हवा होता, मात्र संजय राऊत ते करणार नाहीत. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला, तरी अभिमान बाळगण्याऐवजी संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखी भाषा करतात. भारतीय सैन्याने घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं, तरी तुम्ही म्हणता ते जिवंत आहेत. हा सैन्याच्या शौर्याचा अपमान आहे, संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाने वीर सैनिकांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली.
दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या सर्व खासदारांनी त्यांना मत द्यावे अशी विनंती त्यांनी केली.