Join us  

"महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'पुरता"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 5:06 PM

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेत राहणं योग्य नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी मी केली होती, असं भाजपाचे नेते नारायण राणे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेच नाही. त्यामुळे जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही, तो मुख्यमंत्री कशाला हवा, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'पुरता आहे, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेच नाही. सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही, बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही. त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे की नाही, हेच समजत नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आषाढीनिमित्त उद्धव ठाकरे पंढरपूरला गेले. मात्र त्यांनी मूर्तीला हात लावला का, हार घातला का, प्रसाद घेतला का, असे प्रश्न देखील नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे वारकरी संप्रदायाचा अपमान झाला असल्याचे देखील नारायण यांनी सांगितले. त्यामुळे नारायण राणेंच्या या टीकेनंतर सरकार आणि शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी, नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या पंढरपूरवारीवरुन निशाणा साधला होता. मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहे. मात्र यावरुन निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.  

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करु, असा टोला देखील निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा पार पाडली होती. या महापुजेनंतर त्यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, मंदिरात भाषण करायचं नसतं, आपण सगळेजण माऊलींचे भक्त म्हणून जमलो आहोत, ना कोणी मुख्यमंत्री ना अधिकारी माऊलींसमोर आपण सगळे सारखेच आहेत. हा मान मला मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता, मान मिळाला पण अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल हेदेखील कधी विचार केला नव्हता असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगतिले होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे महाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस