Join us  

राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप

By मुकेश चव्हाण | Published: January 22, 2021 3:37 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली/ मुंबई: मुंबई: गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. 

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा येवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरीही दूसऱ्या विवाहाची माहिती धनंजय मुंडेंनी लपवली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला यांचं स्पष्टीकरण द्यावच लागेल, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या सध्या दिल्लीमध्ये असून त्यांनी दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाचीही भेट घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 

तत्पूर्वी, धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.  गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर कारवाई करावी- चित्रा वाघ

रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही चित्रा वाघ यांनी सांगितले. 

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणातात...

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेकिरीट सोमय्यामहाराष्ट्र सरकारभाजपाधनंजय मुंडे