Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत, म्हणून ही साडेतीन लोकांची नाटकं'; किरीट सोमय्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 19:23 IST

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणा विरोधात दंड थोपटले असून, सगळ्यांना कळेल आता महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच. भाजपचे साडेतीन शहाणे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानानंतर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहे. जर मी गुन्हा केला असेल, तर मी आतमध्ये जाईन, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या म्हणाले की, विषय बदलण्यासाठी शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जातेय. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत, म्हणून साडेतीन लोकांची नाटकं असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले. तसेच आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावीत असंही ते यावेळी म्हणाले.

कोविड घोटाळा इतका मोठा झालेला आहे, त्यात सगळे फसले आहेत, अडकले आहेत. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणून साडे तीन लोक, दिड लोक आणि एक लोक, असं सुरु आहे. साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे काय मुहूर्त शोधत होते काय?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

त्यांचा पेपर मी का फोडू?- नाना पटोले

संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी का फोडू? त्या साडेतीन शहाण्यांना आता झोप लागणार नाही, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहू देत. काही दीडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. 

दरम्यान, भाजपचे साडे तीन लोक हे त्याच अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. महाराष्ट्रात सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचे ते करा. आता मी घाबरणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेकिरीट सोमय्याशिवसेनाभाजपा