Join us  

मुख्यमंत्र्यांच्या FB लाईव्हमधील अत्यंत 'सत्य वाक्य', भाजपा नेत्यानं काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 8:56 PM

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी काही राज्यातील जनतेलाच प्रश्न विचारला. लॉकडाऊन करायचं का नाही? असे म्हणत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी, माझ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही घरात बसून दिलं असेल, हो किंवा नाही... असं

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या शेवटी लॉकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावरुन भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. 

मुंबई - देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. (increase in coronavirus patients in Maharashtra) त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी, वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या शेवटी लॉकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावरुन भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी काही राज्यातील जनतेलाच प्रश्न विचारला. लॉकडाऊन करायचं का नाही? असे म्हणत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी, माझ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही घरात बसून दिलं असेल, हो किंवा नाही... असं. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय, पण तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. त्यामुळे ते मला ऐकू येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील आठ दिवस राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीपाहून लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर विनामास्क फिरणं, गर्दी करणं, सुरक्षित अंतर न ठेवणं, विनाकारण बाहेर पडणं हे टाळावं लागेल. मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा, असा संदेशच मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजच्या FBlive मधल अत्यंत सत्य वाक्य म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही हे बरोबर असल्याचं म्हटलं. कारण, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता संकटात आहे, ती मदतीचा हात मागते. पण, तुम्ही घरात बसून असल्यामुळे त्यांचाआवाजच तुमच्यापर्यंत पोहचत नाही, त्यांना ना मदत, ना दिलासा, असा टोला केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटरवरुन लगावला.  

मास्क हीच आपली ढाल

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं औषध तेव्हाही नव्हतं, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झालं असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

पक्ष वाढवूया कोरोना नको

पक्ष वाढवुया, कोरोना नको वाढवुया असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्यांनाही विनाकारण आंदोलन न करण्याचं सूचवलं. तसेच, पुढील काही काळासाठी राज्यात मिरवणुका, मोर्चे, यात्रा आणि आंदोलनांना बंदी घालण्यात येत असल्याची घोषणाच केली. एका यंत्रणेवर ताण टाकायचा आणि आपण बेभान वागायचं, हा त्या एका यंत्रणेवर केलेला अमानुषपणा नाही का, सगळ्यांना आयुष्य जगालया पाहिजेय, असेही ते म्हणाले. तसेच, माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार. आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  

ब्रिटनमध्ये लॉकडाऊन आहे

सुरुवातीच्या काळात कोरोनाची लढाई आपण धीराने लढलो, आपण बेडपासून ते कोविड सेंटरपर्यंत मोठ्या झपाट्याने कम केलंय. पण, मधल्या काळात आपण पुन्हा कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नाही, आपण शिस्तीचं पालन करण्यात ढिलाई केली. तुमच्या मागणीनुसार मंदिरापासून ते लोकलपर्यंत सर्वकाही सुरू केलं. पाश्चिमात्य देशात अजूनही लॉकडाऊन आहे, ब्रिटनमध्ये डिसेंबरपासून लॉकडाऊन आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क थांबवणं हाच उपाय, असल्याच मुख्यमत्र्यांनी सांगितलं. माझे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा रद्द केलाय, त्यांनी दाखवलेली ही तत्परता उल्लेखनीय आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करत मुलासह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करतो, असेही ठाकरे म्हणाले. 

कोविड योद्ध्यांचा सन्मान व्हावा, पण...

कोविड योद्ध्यांचा सन्मान करायलाच हवा, पण त्यांचा सत्कार करताना आपण कोविड दूत होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. अमरावतीमध्ये आज हजारांच्या आसपास रुग्ण सापडले आहेत. आता, कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं तर आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडेल, असा प्रश्न लोकांना केला. सध्या राज्यात 53 हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आज 7 हजार नवीन रुग्ण सापडले आहे. तर, मुंबईतील आकडा 800 ते 900 पर्यंत गेलाय. कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारतेय. त्यामुळे, मी जिल्हाधिकाऱ्यांना बंधन घालण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीकोरोना वायरस बातम्यामुंबईभाजपा