Join us  

...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:47 PM

विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही, अशी जाहीर खंत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही दिवसांआधी शिव्या घालणाऱ्या धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. परंतु मी चाळीस- बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही, अशी जाहीर खंत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. एकनाथ खडसेंच्या या विधानावर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील एका मराठी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तिकिट माघितली नव्हती. गोपीनाथ पडळकर यांना विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाजपाने घोड्यावर बसवलं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांआधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते.मात्र अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना डावललं जाते. त्यामुळे भाजपा कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र मंगळवारी अजित गोपछेडे यांना माघार घ्यायला लावून डमी अर्ज भरलेले रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपाच्या या भूमिकेनंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा देखील दिला आहे.

विधान परिषदेसाठी माझे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले होते. मात्र आता आमच्या तिघांऐवजी नवीन माणसांना संधी देण्यात आल्याची नाराजी एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली होती.

टॅग्स :विधान परिषद निवडणूकगोपीचंद पडळकरअजित पवारएकनाथ खडसेचंद्रकांत पाटीलभाजपा