Join us

'...तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे'; भाजपाची राऊतांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:43 IST

ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर टीका केली आहे.

मुंबई-  मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. 

प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.

ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. पत्रा चाळीतल्या मराठी माणसांना लुबाडून तर ही संपत्ती गोळा केली होती. तुमचा अपमान हा मराठी माणसाचा अपमान असेल तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे, असं म्हणत, बरोबर ना संपादक महोदय, असा टोला देखील लगावला आहे. 

दरम्यान, माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल. महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :संजय राऊतअतुल भातखळकरशिवसेनाभाजपा