Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राजनाथ सिंह जिंकून आलेत; पंतप्रधानांना फोन करुन मागच्या दाराने मुख्यमंत्री झाले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 21:55 IST

उद्धव ठाकरेंच्या या विधानवरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं. 

दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या वादावरुन देखील निशाणा साधला.  राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता. पण, सावरकर आणि महात्मा गांधी यांची नाव घेण्याची तरी आपली लायकी आहे का? असा विखारी सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विधानवरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. भातखळकर ट्विटद्वारे म्हणाले की, सोनिया मतोश्रींचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी हा किती मोठा विनोद. अहो ते जिंकून आलेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने CM थोडेच झालेत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. 

अजून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झालेला नाही- उद्धव ठाकरे

तुम्ही (देवेंद्र फडणवीस) दिलेला शब्द पाळला असता तर आजही तुम्हीच मुख्यमंत्री असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शब्द पाळला नाही. पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मी बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण झालेलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असा शब्द मी बाळासाहेबांना दिलेला होता. तो अद्याप पूर्ण करायचा आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवायचं आहे. बाळासाहेबांना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.

...तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो- उद्धव ठाकरे

"मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेअतुल भातखळकरशिवसेनाभाजपा