भाजपा नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर बैठक, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:04 IST2022-09-13T13:03:41+5:302022-09-13T13:04:35+5:30
Ashish Shelar met Sharad Pawar: भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाजपा नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर बैठक, तर्कवितर्कांना उधाण
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार नाट्यमय घडामोडींनंतर कोसळल्यापासून महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदात आरोप प्रत्यारोप रंगत आहेत. त्यातच भाजपाने शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या दिशेने चाल करत येत्या काळात हा बालेकिल्ला सर करण्याची घोषणा केल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. मात्र यादरम्यान, भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे आले होते. तिथे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात काही काळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
भारतीय क्रिकेटमधील आघाडीची क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लवकरच होणार आहे. शरद पवार आणि आशिष शेलार हे दोघेही मुंबई क्रिकेट संघटनेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे या भेटीत या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.